मॊहित पाठक(गुरूजी) 9822397570
कथा

श्री. योगेश्वरी मातेच्या प्रचलीत लोककथा खालीलप्रमाणे आहेत


श्री. योगेश्वरी माता कोकणस्थांची कुलस्वामिनी मराठवाड्यात/देशावर कशी काय ? हा सर्व कोकणस्थांना पडणारा प्रश्न आहे . त्याचे उत्तर आपल्याला खालील लोककथा वाचल्यावर लक्षात येईल अशी अपेक्षा आहे .

>>>> लोककथा 1 :-


     पूर्वीच्या काळी अंबाजोगाई व इतर आजूबाजूच्या परिसरात दंतासुर नावाच्या राक्षासाने धुडगूस घातला होता . त्याच काळात पार्वतीला सर्व ऋषी-मुनींनी विनंती केली की तू कुमारिका अवतार घ्यावा व दंतासुर नावाच्या राक्षसाचा वध करावा .

     कुमारिका अवतार यासाठी की दंतासुर राक्षसास वर होता की त्याचा वध फक्त कुमरिकेच्या हातून होईल त्यामुळे पार्वतीस कुमारिका अवतार घेण्याची विनंती केली गेली . त्याप्रमाणे पार्वतीने मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा रोजी कुमारिका अवतार घेतला व दंतासुर नावाच्या राक्षासाचा वध केला .

    पुढे अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर इथेच थांबायचे का काय करायचे हा यक्ष प्रश्न होता . सर्व ऋषी-मुनींनी देवीस विनंती केली की , आपण येथेच वास्तव्यास रहावे व शंकरा सोबत विवाह करावा . पण , देवीची विवाह करण्याची इच्छा नव्हती तरीही सर्वांच्या आग्रहास्तव देवीने विवाह करण्यास होकार दिला व एक अट घातली की , सूर्योदयापूर्वी विवाह झाला पाहिजे अन्यथा विवाह होणार नाही . सर्वांनी ही अट मान्य केली , पण मुळात देवीची इच्छा नसल्यामुळे देवी सकाळी विवाह मुहूर्तापर्यंत तयार झाली नाही व विवाह मुहूर्त टळला . त्यानंतर देवी कुमारिका अवतारात इथेच थांबली .

    विवाह न झाल्यामुळे शंकर देवांना राग अनावर झाला व त्यांनी तेथे विवाहस्थळी एक शाप दिला की , येथील सर्व वऱ्हाड व परिसर सर्व दगडाचा व्हावा , शंकर देवांची शाप वाणी खरी ठरली व लग्नासाठी आलेले हत्ती व लग्नासाठी घातलेला मंडप सर्व दगडाचे होऊन बसलेले आपणास आजही पहावयास मिळतात . हे ठिकाण योगेश्वरी मंदिरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहे . या ठिकाणाला हत्तीखाना किंवा जोगाईचे माहेर या नावाने ओळखतात .

>>>> लोककथा 2 :-


     श्री.परशुराम कोकण प्रांतात समुद्र किनाऱ्याजवळ वास्तव्य करीत होते . एके दिवशी चौदा तरूणांची प्रेते समुद्राच्या लाटांबरोबर वाहत आलेली त्यांना दिसली . परशुरामांनी त्या मृत तरुणांना बाहेर काढले व सजीव केले . हे तरूण मृत झाल्याची त्यांना चितेवर चढवल्याची वार्ता सगळीकडे पसरली होती . पण ते आता चित्पावन झाले होते . पुढे ह्या चित्पावन तरूणांना आपली मुलगी देण्यास कोणीही तयार होईना . वधु शोध निमित्ताने परशुरामसह हे लोक अंबाजोगाई ला आले . येथील लोकांजवळ त्यांनी विवाहाचा मनोदय व्यक्त केला . येथील लोकांनी त्यांच्याशी आपल्या मुलींच्या विवाहांना संमती दर्शवली , पण एक अट घातली ती अशी की ह्या दाम्पत्यानी व त्यांच्या वंशजांनी योगेश्वरी देवीला आपली कुलदेवता मानावी . त्यानी ही अट मान्य केली विवाह विधीवत संपन्न झाले . आलेली मंडळी विवाहित जोडप्यांसह कोकणात परतली . तेव्हापासून श्री.योगेश्वरी देवी चित्पावनाची कुलदेवता झाली .

चौदा प्रेते जे वाहत आली ती चौदा ही कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रे आहेत असे मानतात . ती खालीलप्रमाणे
अत्री , कपी , काश्यप , कौंडिण्य , कौशिक , गार्ग्य , जमदग्नी , नित्युंदन , बाभ्रव्य , भारद्वाज , वत्स , वसिष्ठ , विष्णूवृद्ध , शांडिल्य .

मोहित दिपकराव पाठक (गुरूजी)

अंबाजोगाई जि:- बीड 431517


होम

कथा

कुलधर्म कुलाचार माहिती

विविध सेवा / विधी माहिती

नवरात्र व जन्मोत्सव माहिती

बोडण माहिती

दैनंदिन उपासना व आरती

प्रेक्षणीय स्थळे

सहल माहिती

फोटो

संपर्क